जे जे उत्तम

नंदन नी सुरु केलेला "जे जे उत्तम" चा टॅग, प्रथम विद्या आणि मग प्रिया कडुन मला मिळालेला.
खरं म्हणजे, मधे सानिया यांचं "स्थलांतर" वाचत होतो, तेव्हा वाचता-वाचता एखादा पॅरा आवडला, तर तो इथे टाकु असं वाटलेलं. पण आळशीपणा केला.
anyway, जे झालं, ते झालं.
सध्या जे वाचत आहे, त्यातला मला आवडलेला एक पॅरा खाली मांडत आहे.

-----

या उपक्रमाबद्दल नंदनचीच प्रस्तावना:

पुस्तक वाचताना, अनेकदा काही परिच्छेद आवडतात. संपूर्ण पुस्तकाचा विचार केला तर ते कदाचित तितके महत्त्वाचे नसतीलही; पण त्या त्या वेळेला ते आवडून जातात. असेच काही आवडलेले उतारे, कुठल्याही भाष्याशिवाय देण्याचा हा एक उपक्रम.

-----

"सुमेधसोबत कधीपासुन काम करत आहेस?" ताईंनी विचारलं.
"रेग्युलर असं या प्रकल्पपासुनच. म्हणजे अशातच. पण गेल्या काही वर्षांपासुन जात होते ’प्रगत’ मधे अधुनमधुन. सुमेध आणि मी एकाच कॉलनीत राहतो." मी घाईघाईनं माहिती पुरवली.
"या प्रकल्पाचा अहवाल तूच लिहिते आहेस क?"
"हो. परवा दिल्लीला एक सेमिनारही अटेंड केलं याच विषयावरचं."
"अरे वा. बरंच लवकर तुला सेमिनारला वगैरे पाठवलं की सुमेधनं. वर्ष झालं का तुला जॉइन होऊन?"
"नाही अजुन."
"फारसं कुणी टिकत नाही ’प्रगत’ मध्ये." त्या अंदाज घेत बोलल्या.
"हो. असं ऐकलंय मीही." मी शांतपणे म्हणाले.
"तुझा काय विचार आहे?"
"काहीच नाही."
"म्हणजे?"

"म्हणजे असं, की विचार वगैरे करुन काही विषेश होत नसतं असं वाटतंय मला आजकाल. उगीच खूप काही पुढचे अंदाज बांधत बसायचे, असं झालं तर असं करु म्हणुन प्लॅनिंग करयचं, त्यासाठी काहीतरी तजविजी करायच्या, पूर्वतयारी म्हणुन चक्क काही तडजोडीही आधीच करायच्या... आणि मग ते तसं काही झालं नाही किंवा भलतंच काही झालं की आपण खल्लास. त्यापेक्षा जेव्हा जशी वेळ येईल तेव्हा तसे निर्णय घ्यायचे. कृती करायची. हे उत्तम. काही वाईट होत नाही विचार न केल्यानी, झालं तर चांगलंच होतं... असं वाटतंय.
एक गोष्ट ऐकली होती मी एका किड्याची..
एका किड्याला शंभर पाय होते. तो आपला चालला होता नेहमीप्रमाणं आपलं अन्न मिळवायला. रस्त्यात त्याला एक विचारवंत भेटला. किड्याला पाहुन तो थांबला. त्याने किड्याला नवलानं विचारलं, ’मी चार पायांचे, सहा-आठ-बारा पायांचे किडे पाहिले आहेत. ते कसे चालतात तेही पाहिलं आहे. पण तुला तर शंभर पाय आहेत चक्क. या शंभर पायांनी तु चालतोस कसा?"
किडा म्हणाला, ’ते तर मलाही नाही माहित. विचार करुन सांगतो.’
विचारवंत निघुन गेला.
किडा विचार करु लागला. बराच वेळ विचार केल्यावरही त्याला उत्तर काही सापडलं नाही. आणि मग एकदम त्याच्या लक्षात आलं की, आपण चालायचेच थांबलो आहोत. असेच थांबुन राहिलो, तर अन्न कसं मिळेल?
मग किड्यानी विचार करायचं थांबवलं आणि चालायला सुरुवात केली."

पुस्तक: ब्र
लेखिका: कविता महाजन

-----

कुणाला ’खो’ देऊ आता? कुणी अजुन ह्यात सहभागी झालं नाहीये? नक्की माहित नाही, तरी पण -

जास्वंदी
संवादिनी
स्नेहा
विभा
सर्किट

आणि ज्यांचा ’खो’ मी इतक्या उशिरा घेतला - विद्या आणि प्रिया - kindly forgive me for my procrastination & laziness. :)
फिर वही रात हैं...

वेडेपणा
"तु वेडा आहेस का?? एक-दोन आठवड्यांपुर्वी तुला ताप होता. प्रॅक्टिस काहीच केली नाहीस! आणि direct half marathon?"
- "अरे! टॉम करु शकतो, तर मी का नाही?"
"कोण टॉम?"
- "माझा US मधला बॉस! ५२ वय आहे त्याचं. गेल्या वर्षी न्युयॉर्क, बॉस्टन आणि शिकागो मॅरेथॉन पळाला तो. वयाच्या ४५व्या वर्षी त्यानी मॅरेथॉन पळायला सुरुवात केली. मी तर २९ आहे. ४५ पर्यंत वाट बघु का?"
"पळ बाबा! चुकीच्या लोकांकडे बघत असतोस तु. आमच्याकडे बघायचं. निवांत जगायचं...पण तुला नाही पटणार.. जाऊ दे.. पण निदान प्रॅक्टिस तरी करायची.."
- "हो! ते खरंच चुकतय! पण पुढच्या वेळेस प्रॅक्टिस करेल. ह्या वेळेस असंच पळुन बघतो."

असं होतं ना आपलं. कुठुन तरी, कोणा कडुन तरी आपल्याला प्रेरणा मिळते. काहीतरी वेगळं करुन बघायला. स्वत:ला challenge करायला.
मराठीत लिहायला घेतलं, ते सुद्धा असंच काहीतरी. दुसऱ्यांचे ब्लॉग्स वाचुन, त्यावर कमेंट्स लिहुन.. कुठेतरी असं वाटलं.. आपण पण लिहुन बघावं..प्रॅक्टिस नव्हतीच काही.. मराठीत लिहिण्याची..त्या आधी इंग्रजी मधे लिहित होतो, ते सुद्धा e-mails पुरतंच..पण कुठेतरी, कधीतरी वेडेपणा करतोच आपण... आणि तसंच मराठीत लिहायला सुरु केलं..

खाज़
चहाच्या टपरीवर ते दोघं बाकावर बसले होते. सकाळची ९.३०-१०ची वेळ. दोघं ९-१०वीतले वाटत होते.
"छ्य्या!! मला नाही जमत! कितीही प्रयत्न केला, तरी मला नाही जमत. तु लई भारी! कसं जमतय तुला?"
-"अरे, सोपं तर आहे! हे बघ, असं कर! एक मोठा पफ आत घे.... "
पुढंचं सगळं explain करुन पठ्ठ्यानी मस्त रिंग्स काढले. त्याचा मित्र proudly त्या सिगरेट पफच्या रिंग्सकडे बघत होता.

नविन काही सुरु केलं की एक खाज़ असते ना.
काहीतरी वेगळं करायची.
लिहिण्याचं पण असंच असतं ना.
एखादा वेगळा विषय निवडायचा.
किंवा एखादी वेगळी style.
काही नविन शब्द वापरायचे.

सिगरेट सगळेच फुकतात. रिंग्स फार कमी जणं काढु शकतात.
सगळेच लिहितात, म्हणुन आपण लिहितो - पण आपल्याला रिंग्स जमतात का?
ही खाज़ असतेच प्रत्येकात.

faith/dreamy attitude
परवा Zee Studio वर एक सिनेमा पाहिला.
Miracle on the 34th Street.
स्टोरी अतिशय साधी आहे. X'mas Holiday Season मधे एका departmental store मधे Kris Kringle नावाचा एक म्हातारा Santa Claus म्हणुन काम करतो. स्टोरची मॅनेगर Doris Walkerचा Santa Claus अस्तित्वात असतो, ह्यावर विश्वास नसतो. तिच्या ६ वर्षांच्या मुलीला देखिल ती तेच सांगते, की Santa Claus काही खरा नाही.
त्यांचं संभाषण असं काही होतं,
Kris Kringle: You think I'm a fraud, don't you?
Dorey Walker: Fraud is a bit too strong of a word.
Kris Kringle: But you don't believe in me.
Dorey Walker: I believe that Christmas is for children.
Kris Kringle: Well your daughter doesn't believe in me, either.
Dorey Walker: I don't think that there's any harm in not believing in a figure that many do acknowledge to be a fiction.
Kris Kringle: Oh, but there is. I'm not just a whimsical figure who wears a charming suit and affects a jolly demeanor. You know, I... I... I'm a symbol. I'm a symbol of the human ability to be able to suppress the selfish and hateful tendencies that rule the major part of our lives. If... you can't believe, if you can't accept anything on faith, then you're doomed for a life dominated by doubt.

"faith" नसेल, तर फक्‍त "doubts" राहतील का आयुष्यात?
मी लिहितो, त्याला बऱ्याचदा मला म्हणतात, की "it has a dreamy edge".
की लिहिताना एका "parallel" जगात जातो मी.
असेल, खरंच असेल तसं.
स्वप्नात रहायला प्रत्येकालाच आवडतं, म्हणुनच तर आपण स्वप्न पाहतो.
काही खरी ठरतात. काही नाही ठरत.
निदान तसं काहीतरी स्वप्नवत लिहिलं.. तरी तेवढं तरी satisfaction मिळतं..

कांच के ख्वाब हैं, आंखों में चुभ जायेंगे,
पलकों में लेना इन्हें, आंखों में रुक जायेंगे..
यह रात हैं ख्वाब की, ख्वाब की रात हैं,
फिर वही रात हैं...
रात भर ख्वाब में, देखा करेंगे तुम्हे..
फिर वही रात हैं...

वेडेपणा म्हणा.. खाज़ म्हणा.. faith म्हणा.. dreamy attitude म्हणा..
आपल्याला मुळात लिहावंसं का वाटतं?
एका लहान मुलाला विचारलं, तर तो खरं उत्तर देईल,
"माझं कौतुक होतं म्हणुन मी लिहितो."

हा खेळ मेघना नी सुरु केला, आणि मला खो निमिष कडुन मिळाला - त्या दोघांना धन्यवाद. माझा खो विद्या ला..
एकटा..

ट्रेन मधे माझ्या समोरच खिडकीतल्या जागेवर तो बसलेला. वय साधारण सत्तरीतलं. तसा बऱ्या पैकी उंच, पण एकदम थकलेला. वजन अगदी बेताचंच. कपड्यांवरुन तसा नीटनेटका. किंवा निदान काही वर्षांपुर्वी तरी नीटनेटका असावा. म्हणजे, एक पांढरी-शुभ्र corduroy - पण त्या corduroyच्या lines वापरुन-वापरुन विटलेल्या. काही ठिकाणी त्यावर कसले तरी जुने डाग - गंमत असते ना, कधी-कधी काही डाग जाता जात नाहीत. dark striped शर्ट. sleeves roll up केलेल्या. एका बाहीवर greaseचा डाग. कमरेला brown belt. पायात काळे बूट - चांगले, पण थोडे जुने. सॉक्स देखिल जुने झालेले, त्यांचं elastic अगदी loose. गळ्यात एक जुनीच खाकी शबनम.

३-४ तासाच्या प्रवासात हा माणुस एक शब्दही बोलला नाही. गपचुप खिडकीतुन बाहेर बघत होता. काय एकदा फक्‍त त्यानी आत ट्रेन मधे बघुन हातानीच इशारा केला, आणि एक प्लेट साबुदाणा वडा घेतला. शबनम मधुन एक पार्ले-G चा पुडा काढला. त्यातली २ बिस्किटं खालली, आणि पुडा परत पिशवीत ठेवुन दिला.

झोप आली तेव्हा एक हातात खिडकीवर दुमडुन, दुसऱ्या हातानी खिडकीचा बार धरुन, खाली मान करुन आडव्या हातावर डोकं ठेवलं. वाऱ्यानी त्याची पांधरी-शुभ्र दाढी हलकीच उडत होती. केस पण अगदी लांब वाढवलेले होते - पण डोक्यावर एक स्वच्छ पांढरं कापड घट्ट बांधलेलं. मनगटावर एक घड्याळ. offwhite dial, brown belt. dialवरचं खूप प्रयत्न केला वाचायचा. कुठल्या एका कंपनीला ५० वर्ष झालेली, त्याबद्दल ते घड्याळ होतं.

ऊठल्यावर त्यानी डोळे चोळले. अतिशय निस्तेज डोळे. एकलव्य मधे अमिताभचे कसे होते, अगदी तसेच! कपाळ आणि चेहऱ्यावरच्या सुरकुत्या ऊन्हात straighten करु लागला. घड्याळ पाहिलं. पिशवीतुन पाण्याची बाटली काढली. पाण्याचा थेंब न थेंब आपण पुरवतो असं घोटभरंच पाणि तो प्यायला. हळुच कानवरचे केस त्या पांढऱ्या कापडात खोचले. आणि खिडकीच्या बाहेरच बघत राहिला.

काय असेल ह्याची आयुष्याची स्टोरी? कोण आहे हा? ह्याचा एकट्याचा प्रवास हा केवळ ट्रेन करता की ट्रेन मधुन उतरल्यावर देखिल हा एकटाच असेल? बोलु का मी ह्याच्याशी? पण बोलुन तरी काय बोलणार?

कुठेतरी ह्या सगळ्या प्रश्नांमधे अजुन एक असाच एकटा जीव आठवला. काही महिन्यांपूर्वी दिसलेला. शिवाजीनगरला observatoryच्या चौकात, मी सिग्नलला गाडीवर उभा होतो. तेव्हाच तो वेडा दिसला होता. पांढरे केस, पांढरी दाढी वाढलेली. अंगात अत्यंत मळलेला पायजमा-झब्बा! हातात एक aluminium सुटकेस.सिग्नलला थांबलेल्या प्रत्येक माणसाला तो जवळुन बघत होता, ओळख पटते का बघायला. आणि काहीतरी पुटपुटत होता. मधेच हसत होता स्वत:शी. सिग्नल सुरु झाला तसा हसत-हसत पळु लागला. "हाहाहाहाहाहा!!!"
तो काय बोलत होता, ह्याकडे कोणाचंच लक्ष नसेल. तसं कळत पण नसेल.

आणि इथे माझ्या समोर जो बसला होता, तो न बोललेला पण मला कळत नव्हतं. लक्ष होतं तरी... का कुणास ठाऊक, पण त्याच्याकडे बघितलं की मला एक गाणं आठवत राहिलं...

तेरे बिना ज़िन्दगी से कोई शिकवा तो नहीं, शिकवा नहीं, शिकवा नहीं...
तेरे बिना ज़िन्दगी भी लेकिन ज़िन्दगी तो नहीं, ज़िन्दगी नहीं, ज़िन्दगी नहीं...

ह्या उलट मला शुक्रवारी रात्री बस मधे भेटलेला आभास. वय वर्ष २३. नोकरीला लागुन जेमतेम १-१.५ वर्ष झालेलं त्याला. शेजारी बसलेला माझ्या. सुरुवाती एक-दीड तास तो झोपलेला, तेव्हा मी पुस्तक वाचत होतो. फुड-मॉल नंतर २ तास आम्ही बोलत होतो. म्हणजे तोच बोलत होता. इंदोरचा होता. मुंबईत नोकरी करत होता. पुण्यात मित्रांना भेटायला जात होता. रात्री १२ वाजता तो आणि मित्र औरंगाबादला जाणार होते. मी कुठल्या कंपनीत आहे, ऐकल्यावर आमचे global revenues इतके-इतके billion $ आहे, हे त्यानी मला सांगितलं. त्याचा सध्याचा client कोण, त्यांच वार्षिक उत्पन्न किती billion $ आहे.. आमचे competitors चं वार्षिक उत्पन्न किती billion $ आहे.. सगळे facts & figures, CEO names, industry updates ह्याला तोंड पाठ! म्हट्लं, तुला कसं रे सगळं माहित?
त्यावर उत्तर दिलं.. मला business मधे खूप इंटरेस्ट आहे.. मला MBA करायचा आहे.. म्हणुन मी हे सगळं सतत वाचत असतो.. २ सेकंद मला असं वाटलं.. मी स्वत:शीच बोलत आहे का.. फरक एवढाच होता की मी २९ वरुन २३ वर पोचलेलो...का २३ वरुन २९.. माहित नाही..
बस मधुन उतरताना, त्यानी मला विचारलं.. "मी खुप बोललो ना? तुला खुप बोर केलं ना?"
मी हसत-हसत बस मधुन उतरलेलो...

ट्रेन मधुन उतरलो.. तेव्हा नकळत २३ वर्षांच्या बडबड्या आभासची आणि त्या सत्तरीतल्या अबोल म्हाताऱ्याची तुलना झालीच.. मी दोघांच्या मधे कुठेतरी.. कधी खुप बोलका.. कधी गप्प बसणारा.. भिती एकाच गोष्टीची.. "हाहाहाहाहाहा!!!"