एक बेहतर आयुष्य?

एप्रिल का मे मधे कधीतरी धनंजयनी एक लिंक पाठवलेली. मिंट ह्या दैनिकातलं एक आर्टिकल होतं. मुंबईचा कोण एक भाविक गांधी अटलांटिक महासागर एकटाच पार करु पहात होता. त्यावेळी त्यानी जवळ-जवळ अर्ध अंतर पार केलं होतं. एकट्यानी बोटीतुन स्पेनहून आंटिगुआ हे ३३०० मैल अंतर वल्हवत जायचं. हो, वल्हवत (rowing)... sailing नाही... चेष्टा नाहीये.

त्याची वेबसाईट पाहिलेली तेव्हा. www.bhavik.com
सुरुवातीलाच लिहिलं आहे त्यावर -
"२००० हून अधिक लोकांनी एव्हरेस्ट शिखर गाठलं आहे. पण एकट्यानी वल्हवत अटलांटिक महासागर पार करणं हा पराक्रम ह्या जगाच्या इतिहासात फक्‍त २३ लोकांनी केला आहे. ocean rowing is one of the hardest endurance sports that test the limits of men."
वेडंच म्हणायचं अशा लोकांना नाही? असं कोणी करतं का कधी?

का कुणास ठाऊक, पण काम करताना (?) परवा एकदम आठवण झाली ह्या गोष्टीची. तो punter पोचला का नाही, काहीच कल्पना नव्हती. त्याचं नाव सुद्धा नक्की आठवत नव्हतं, "मेहता" नावानी गुगल करत होतो, तेव्हा अचानक धनंजय ऑनलाईन सापडला, त्यानी पुन्हा नाव सांगीतलं.
मग भाविकची वेबसाईट पुन्हा पाहिली. तिथे अपडेट मिळाला लगेच.
जून १४ ला साहेब किनाऱ्याला पोचलेले. तब्बल १०६ दिवसांनी.
म्हटलं, "सही जवाब!! क्या बात हैं!! आपला punter पोचला एकदाचा!!"

१०६ दिवसात ३३०० समुद्री मैल, ६००० हून जास्त किलोमिटर.
म्हणजे दिवसाला ५५-६० किलोमिटर वल्हवत होता हा माणुस.
दमला की त्याच्या "मिस ऑलिव्ह" ह्या बोटीत झोपत होता.
कंटाळा आला की समुद्रात पोहायचा कधी-कधी.
जेवायचं एकट्यानीच, मिस ऑलिव्ह बरोबर.

तसा एकटा नव्हता. कधी डॉलफिन यायचे, कधी शार्क, कधी flying fish.
GPS / सॅटेलाईट द्वारे जगाशी संपर्क व्हायचा. जगाच्या कोपऱ्या-कोपऱ्यातून त्याला शुभेच्छा मिळत होत्याच. सॅटलाईट द्वारे तो त्याच्या वेबसाईट वर एक ऑनलाईन लॉग ठेवत होता.
एक-एका दिवशी किती अंतर गाठलं, तो नक्की कुठे आहे, त्या दिवशी काय-काय झालं, काही फोटो, काही प्रसंग असं सगळं तो टिपत होता त्या लॉग मधे. त्याच्या वेबसाईटवर आजही हे सगळं वाचायला मिळतं.

पण हे सोपं अजिबात नव्हतं. त्याचे आधीचे ३ प्रयत्न असफल झालेले.
हा चौथा प्रयत्न होता भाविकचा.
अन्न पुरवुन पुरवुन खायचं.
४० फुटी लाटांसमोर तग धरायची.
body sores झालेले. त्यावर मलम स्वत:च लावायचं.

शेवटचे काही दिवस तर hurricane season सुरु झालेला. planned schedule ९० दिवसाचं होतं. त्यात delay झालेला. शंभराव्या दिवसाच्या आसपास कधीतरी दोन मोठ्या लाटांमधे त्याची बोट उलटलेली.
ती बोट सरळ करण्याचे त्राण नव्हते अंगात, मग रात्रभर उलटलेल्या त्या बोटीवरच बसुन राहिला.
दुसऱ्या दिवशी कशी-बशी ती त्याने पुन्हा सरळ केली.
सॅटेलाईट संपर्काकरता लागणारी बॅटरी संपत आलेली.
hurricanes मुळे तो नक्की कुठल्या बेटावर पोचु शकेल, ह्याची शेवटच्या क्षणापर्यंत कसलीच शाश्वता नव्हती.

but finally, against all odds, he succeeded.
१०६ दिवसांनी त्यानी जमिनीवर पाऊल ठेवलं. इतक्या दिवसांनी भाविक २-४ पावलं "चालला".
तिथले पंतप्रधान त्याच्या स्वागताला हजर राहिलेले.
खरंच! केवढी मोठी कामगिरी केली होती त्यानी.

अशी असाधारण गोष्ट साध्य करायची म्हणजे एक जबरदस्त जिद्द पाहिजे.
आणि थोडंसं वेडं असणं देखिल गरजेचं आहे.
नुसतं वेडा म्हट्लं की आपण वेडा म्हणुन सोडुन देतो.
पण कोण एक भाविक, कधीतरी असा एक वेगळाच वेडेपणा जिद्दीनी करुन जातो...

त्याच्याच विचारात मी टेकडीवरुन चालत होतो. stone quarryच्या बाजुचा माझा नेहमीचा रस्ता. म्हट्लं चला आज जरा आड वाटेनी जाउया. म्हणुन एक रानवाट पकडली. रस्ता ओळखीचा नव्हता, आणि टेकडीवर ARAIला पोचायच्या ऐवजी मी थेट सेनापती बापट रोडवर पोचलो.
तिथे फोननी रेंज पकडली, तेव्हा मित्राचा फोन आला, "आज रात्री कॉफी टाकायची ना".
-"हो, चालेल, आता टेकडीवर आहे, नंतर बोलु." म्हणत पुन्हा टेकडी चढायला घेतली.

सूर्यास्त झालेला, मोरांचे आवाज ऐकु येत होते. पावसाळ्यामुळे सध्या सगळ्या टेकडीवर बरीच दाट झाडी झाली आहे. गवतामुळे पायवाटा पटकन दिसत नाहीत. पावसाचं पाणी आडवायला टेकडीवर वेगवेगळ्या altitudesवर कुठे खड्डे खणलेले, किंवा दगडी बांध बांधलेले...बऱ्याच ठिकाणी कंबरे-इतकं गवत वाढलं आहे...

अंधार पडु लागला तशी थोडी भिती वाटु लागली... भरभर चालु लागलो.. घाई केली अन काही वेळा पाय घसरुन खाली पडलो... प्रत्येक वेळेस पडताना खाली दगड आहे, की एखादा साप किंवा विंचु... वाट सापडत नव्हती, आणि अंधार वाढतच होता... प्रत्येक क्षणी काळजाचा ठोका चुकत होता... शेवटी २०-२५ मिनिटांनी मला एक पायवात मिळाली... तिथुन वर चढत गेलो, आणि टेकडीवरच्या stone quarryपाशी पोचलो... जिथुन रान-वाट पकडली होती, त्याच्या २-५ मिनिटंच पुढे पोचलेलो... मधे अर्धा तास गेलेला... आता नेहमीचा ओळखीचा रस्ता सापडलेला... मनातल्या मनात सुटकेचा नि:श्वास सोडला... the ever pounding heart beats returned to their normal rhythm...

ARAI समोरचा डांबरी रस्ता पकडला...रस्त्यावरचे street lamps मला त्या अंधारात रस्ता दाखवत होते...
अपरिचित रानवाट पकडणं हा एक वेडेपणाच झाला ना आपला.. पावसाळ्यात त्या रस्त्यात कुठे एखादा साप आला असता म्हणजे?? त्यात कसली जिद्द दाखवायची??शेवटी ओळखीच्या रस्त्याला लागलो तेव्हाच आपण शहाणे ठरलो ना??

७.३०-७.४५ च्या अंधारात लॉ कॉलेज टेकडीवरुन खाली कांचन गल्ली मधे उतरलो.. फास्टर फेणे style मधे माझ्या यामाहा वर टांग मारली.. आणि वेगात गल्लीतुन खाली उतरताना स्वत:ला पडलेल्या एका rhetorical प्रश्नावर माझे मीच हसलो,

कुठलं आयुष्य बेहतर आहे,
चौकोनी आयुष्यात नांदणाऱ्या माझ्या असल्या भित्र्या शहाणपणाचं?
की त्या चौकोनी आयुष्याची संपूर्ण व्याख्याच बदलायला लावणाऱ्या भाविकच्या जिद्दी वेडेपणाचं?
Seeking paradise... and... each other

ग्लासगोचा भव्य जॉर्ज स्क्वेर. एका बाजुला असलेल्या दोन सिंहाच्या संगमरवरी मूर्ती सकाळची वेळ असल्यामुळे थोड्याशा आळसावलेल्या वाटत होत्या. जेम्स वॉट सारख्या स्कॉटिश इतिहासातल्या मोठ्या-मोठ्या लोकांच्या - पुतळ्यांच्या डोक्यावर कबुतरं बसलेली. रात्री स्वत:च्या प्रकाशात दिमाखात उभे राहणारे लॅम्प-पोस्ट उजेडात झोपी गेलेले. बसायला कडेला असलेले बाक बरेचसे रिकामेच होते. कोण एक स्कॉटिश आजोबा एकीकडे पाईप ओढत बसलेले, दुसरीकडे एक जोडपं प्रेमाच्या गप्पा मारत होतं. काही तुरळक पर्यटक मंडळी आपापले फोटो काढत होते, काही जणं ग्लास्गोचा मॅप बघत होते, तर काही सिटी टुर बसची वाट बघत होते.

हातातलं सामान कसं-बसं संभाळत, ओढत शाल्मली आणि मयंक तो भलामोठा चौक क्रॉस करत होते. समोरच्या क्वीन स्ट्रीट स्टेशन वरुन त्यांची इन्वरनेसची ट्रेन मिनिटात निघणार होती.

आता ती मिळणार की नाही .. एवढ्या दिवसांपासुन प्लॅन केलेली ही ट्रिप.. त्यात पुन्हा हा उशीर.. तरी मी मयंकला सांगीतलेलं, की रात्री लवकर झोपुयात.. उद्या सकाळी-सकाळी वाजताची ट्रेन आहे आपली.. पण ह्याला अख्खी रात्र जागं रहायचं होतं.. माझ्या कुशीत.. बोलता-बोलता कधी डोळा लागला दोघांचा.. गज़र लावलाच नव्हता.. मॉमचा फोन आला wish करायला, म्हणुन तरी बरं झालं... नाहीतर इन्वरनेस आम्ही माझ्या ग्लासगोच्या अपार्टमेंट मधेच पाहिलं असता...

"बघ, मिळाली ना तुझी ट्रेन. तु आपली उगिचच काळजी करत होतीस. अरे जब तक यह मयंक वालिया तुम्हारे साथ हैं, तब तक तुम्हें, मतलब शाल्मली वालिया को टेन्शन लेने की कोई जरुरत नहीं हैं."

- "पहिली गोष्ट - नुसतं शाल्मली वालिया नाही, तर शाल्मली भसीन-वालिया! दुसरी - माझी ट्रेन नाही - आपली ट्रेन! आणि तिसरी गोष्ट - तुझ्यामुळेच आज आपली ट्रेन चुकणार होती. तरी बरं, माझ्याच मॉमनी फोन करुन उठवलं आपल्याला."

" बरं, बरं. एवढी काय लगेच मनाला लावुन घेतेस. आणि माझ्यामुळे उशीर का गं? आता माझी लंडनची ट्रेन काल दोन तास उशिरा पोचली इथे. मग आपल्याच लग्नाचा आज तिसरा वाढदिवस म्हणुन मग मी काल किती उत्साहानी केलेलं तुझं आवडतं बटर चिकन, बिर्यानी आणि खास तुझ्याकरता आणलेली Chardonnay! ठीक आहे, सध्या मी शिकत आहे म्हणुन, पण हा आपल्या घरच्या घरीच अरेंज केलेलं candle light dinner चा कार्यक्रम तुला आवडला नाही का? आणि नंतरचा साल्सा?"
- "तसं नाही रे. आवडलं ना, खूप-खूप आवडलं! मला माहित आहे की तु सगळं माझ्या करताच केलंस. नेहमीच माझी साथ देतोस. मला काय आवडतं, काय हवं ते लक्षात ठेवतोस."

"Thats because I love you Shalmali. शेवटी मला जास्ती काही नको गं - फक् तुझ्याशी बोलत-बोलत तुझ्या कुशीत डोकं ठेवुन निरंतर तुझ्याकडे पहात रहायचं.. बाकी सगळं विसरुन..."
- "अरे! विसरण्यावरुन आठवलं! आपल्या ह्या गडबडीत मी आपले sandwiches फ़्रीज़ मधेच विसरले. आता ब्रेक-फास्ट काय करायचा?"

"अरे! टेन्शन मत ले यार - यह मयंक वालिया हैं ना! घरातुन निघायच्या अगोदरच मी ते sandwiches माझ्या जॅकेटच्या खिशात टाकले! देखा!"


तीन वर्ष! बाप रे! अचानक आपण खूप जास्ती मोठे झालो असंच वाटतंय. अजुन तर आपल्या कितीतरी मित्र-मैत्रिणींची तर लग्न पण नाही झालीत. कुठे एका दिल्लीतल्या पब मधे आपण मयंकला पहिल्यांदा भेटलेलो. दिसायला तर तो फारच रुबाबदार आणि देखणा होता, आहे. शिवाय त्याचं लाघवी बोलणं, his high respect for the fairer sex, आणि त्याचं अफलातून नृत्य-कौशल्य - बावीसाव्या-तेवीसाव्या वर्षी ह्या कारणांमुळे त्याच्यावर भाळणारी हीच का मी ती होते! How immature and naive! तरी - महिने मी त्याला पारखत होतेच - आणि दिवसागणिक तो मला अधिक आवडु लागलेला.

घरी मॉम-डॅडना सुद्धा मयंक आवडलेला. लग्नाचा विषय निघाला तेव्हा त्यांनी लगेच संमती दिली. पण डॅड मला बोललेले,
"बेटा! तुझी निवड आम्हाला पसंतच आहे, कारण शेवटी तुलाच तुझं आयुष्य त्याच्याबरोबर घालवायचं आहे. पण पुन्हा एकदा विचार कर - आपण आर्मीवाले. तुला आपल्या कडक शिस्तीची सवय आहे. जरी आपण पंजाबी, आणि मयंक सुद्धा पंजाबी, तरी त्यांची business family आहे. त्यांची lifestyle वेगळी, आपली वेगळी. तुला फार मोठी adjustment करावी लागेल. तयारी आहे तुझी?"
- "Yes dad! Of course, I am aware of this - it is just that I love him so much that I am willing to make all those adjustments that come my way."

प्रेम आंधळं म्हणतात ते ह्यालाच कदाचित! काय adjustment करावी लागेल, ह्याची कशाचीच कल्पना नव्हती. मयंकच्या घरुन तर किती विरोध होता, पण शेवटी कशालाही अन कोणालाही जुमानता आम्ही लग्न केलं.



"शाल्मली, किती अप्रतिम आहे ना ही जागा?असंच आपलं एक छोटंसं कॉटेज असावं... त्याच्या मागे असंच छोटंसं लॉन...बाजुला संथ वाहणारं एक छोटंसं निर्झर.. तु आणि मी असं निरंतर ह्या हॅमॉक मधे एकत्र पडुन रहायचं रात्रभर.. एक दूसरे की बाहों में... कभी दूर उन सितारों को देखते रहे हम दोनो... और फिर मेरे दिल की यह आवाज़ तुम्हारे दिल तक पहुंचती रहे...
यह रात हैं, या तुम्हारी ज़ुल्फ़ें खुली हुई हैं
हैं चांदनी, या तुम्हारी नज़रें से मेरी रातें धुली हुई हैं
यह चांद हैं, या तुम्हारा कंगन
सितारें हैं, या तुम्हारा आंचल
हवा का झोंका हैं या तुम्हारे बदन की खुशबू...


कंगन! ते कंगनच तर प्रॉब्लेम होते. लग्ना आधी मी दिल्लीच्या government hospital च्या child care unit मधे काम करत होते. लग्ना करता कशी बशी आठवडे सुट्टी मिळाली होती. रिती-रिवाजांनुसार लग्नानंतर ४० दिवस मला ते कंगन आणि बांगड्या हातातुन काढायच्या नव्हत्या. आधीच माझे हात इतके नाजुक, त्यावर ते जड कंगन - शेवटी भिती होती तेच झालं - माझ्या हातांना जखम झालीच. पण तरी ते कंगन ४० दिवस काढायचे नाहीत, असा सासरी हुकुम मिळाला!

नोकरीवर पुन्हा रुजु झाले, तेव्हा माझं premature born babies च्या incubator cell मधे काम होतं. माझ्या हाताच्या जखमा पाहुन डॉक्टरांनी मला तिथे जायला मनाई केली.
Feeling utterly frustrated and helpless, मग मी ते ४० दिवस घरीच काढलेले.
त्यानंतर पुन्हा कंगन घातलेच नाहीत कधी!
दिवसेंदिवस अशा कितीतरी adjustments करत होते...


लग्नाला जेमतेम एक वर्ष झालं, आणि मला ही सुवर्णसंधी मिळाली - ग्लास्गो युनिव्हर्सिटीमधे autistic मुलांवर रिसर्च - तीन वर्षांचं PhD! मयंकला ह्याची लग्ना-आधीपासुनच कल्पना होती - सासरी नव्हती - पण मी ठाम होते. माझ्या करियरच्या द्रूष्टीने हे खूप महत्त्वाचं होतं. आणि मग मी ग्लास्गोला आले.

एक वर्षानी मयंक लंडनला आला, MBA करायला. family business सोडुन. त्याच्या घरातल्या सगळ्यांचा विरोध पत्करुन. माझ्याकरता. फक्त माझ्यावरच्या प्रेमाकरता.

यह कहां गये हम, यूं ही साथ चलते चलते...


नेस नदीच्या काठावरच्या सुंदर promenade वरुन दोघं चालत होते. नदीच्या प्रवाहाच्या उलट दिशेनी. वाटेत छोटी-छोटी टुमदार कौलारु घरं. त्यांसमोर सुंदर रंगबिरंगी flower beds होती. संध्याकाळची दिवे लावणीची वेळ झालेली.चालत, चालत दोघं बरेच पुढे आलेले. नदीच्या पात्रातच छोटी-छोटी बेटं होती. एका काठावरुन दुसऱ्या काठावर जायला छोटे-छोटे पूल होते. जिथे बेट होतं, तिथे पलीकडे जायला छोटे पूल होते. पुलावर उभं राहुन, दोघं बेटावरच्या झाडांवरच्या पक्षांचे संवाद ऐकत होते. पुलाखालुन वाहत जाणाऱ्या पाण्याची खळखळ वेगळी ऐकु येतच होती.

"सिर्फ एक साल और शाल्मली, सिर्फ एक साल और! मग आपण पुन्हा एकत्र येऊ. माझा MBA संपेल, तुझं PhD सुद्धा संपेल तेव्हा. तो पर्यंत तरी मी लंडन मधे आणि तु ग्लास्गो मधे, असे एकमेकांपासुन दूर राहु. तुझ्या शिवाय मी कसा राहतो, माझं मलाच ठाउक आहे..."
-"मला समजतय रे मयंक. तुझ्याच भरवशावर तर मी इथवर मजल मारली आहे. पण एक वर्षानंतर काय होणार आहे आपलं? तुला वर्क पर्मिट नाही मिळाला तर? तुला जॉब नाही मिळाला तर?"

"तेव्हाचं तेव्हा पाहु गं!"
-"असं नाही रे! तुला माहित आहे. मी ग्लास्गो, म्हणजे स्कॉटिश युनिव्हर्सिटीत आहे. माझं PhD संपल्यावर मला ग्लास्गो मधे सहज नोकरी मिळेल - तिथेच, युनिव्हर्सिटीतच मला ऑफर पण आली आहे. पण लंडनहून MBA म्हटल्यावर तुला इथे स्कॉटलंडचं वर्क पर्मिट मिळणं अवघड आहे. मग पुन्हा तु लंडन आणि मी ग्लास्गो, असंच होणार का आपलं?"

"अगं पण मला वर्क पर्मिट मिळालं तर तुला देखिल लंडनला माझ्याबरोबर येता येईल ना? तिथल्या एखाद्या हॉस्पिटल मधे देखिल तुला autistic मुलांवर उपचार करता येतीलच ना?"
-"हो रे! ते तर झालंच रे! पण तुला वर्क पर्मिट नाही मिळाला तर? तर काय?"

"मग.. मग.. दुसरा कुठलाच उपाय नाही - भारतात परत जायचं!"
-"ह्म्म्म... पण म्हणजे मी गेले तीन वर्ष जे कष्ट घेतले, ते वायाच गेले ना?"

"असं का म्हणतेस गं?"
-"मग काय रे! जे मी इथे शिकले, ते तिथे मला उपयोगी पडणार नाही असं नाही. पण पुन्हा तिथे स्वत:ला establish करायचं, पुन्हा सगळं struggle, आणि पुन्हा तुझ्या घरातल्यांशी..."

"माझ्या घरी?? आपल्या घरी ना?"
-"हो रे! मला तसं नव्हतं म्हणायचं.. पण तुला कळलं ना मला काय म्हणायचय..."

"शाल्मली, मी फक्त तुझ्या करताच एवढा लांब आलो आहे. आणि या पुढेही मी तुझ्याच बरोबर राहणार आहे. तु काळजी नको करुस गं! काहीतरी मार्ग काढेल हा मयंक वालिया. जब तक यह मयंक वालिया तुम्हारे साथ हैं, तब तक शाल्मली वालिया... शाल्मली भसीन-वालिया को टेन्शन लेने की कोई जरुरत नहीं हैं."

-"Thanks Mayank, I love you."
"I love you too darling. चल, आपण खूप दूर प्रवाहाविरुद्ध चालत आलो आहे. परत जायचं का आता?"
-"थोडा वेळ इथेच थांबु रे. छान वाटत आहे इथे. परत तर जावंच लागेल. अजुन थोडंसच थांबु जरा."
"तु म्हणशील तसं! शेवटी काय आहे ना,
तुम कहो, तो रुके
तुम कहो, तो चले
मुझको पहचानती हैं कहां मंज़िलें...

सूर्य मावळायच्या तयारीत होता. नेस नदीच्या पुलावर दोघं उभे होते. खाली नदी संथ वाहत होती. दूरवरचे पक्षी आपापल्या घरी परतलेले. आभाळ भरुन आलेले. दूर क्षितिजावर मावळणाऱ्या सूर्याच्या प्रकाशातुन उत्पन्न झालेल्या त्या अतिविलक्षण अशा एका सूर्यस्तंभाकडे ते दोघं पहात तसेच उभे होते.. स्तब्धपणे.. एकमेकांचे हात, हातात धरुन...
देखना मेरे सर से.. आसमा उड गया हैं..
देखना आसमा के सिरे खुल गये हैं ज़मीन से..
देखना क्या हुआ हैं.. यह ज़मीन बह रही हैं..
देखना पानीयो में ज़मीन धुल रही हैं, कहीं से..

and thus, they stood in each other's embrace.. seeking paradise... and... and each other..