टिपिकल टुरिस्ट ठिकाणी गेलं, की ते टिपिकल टुरिस्टी लोकं भेटणं अगदी स्वाभाविक असतं, नाही का?

हात धूवुन आपल्या मागे लागणारे गाईड्स, गळ्यात कॅमेरा लटकवणारे आणि हातातले सॅम्पल फोटो दाखवणारे फोटोग्राफर मंडळी, चणे-फुटाणे किंवा आईस-क्रीम विकणारे - ह्या टिपिकल टुरिस्टी मंडळींना इथे US मधल्या टुरिस्ट ठिकाणांवर मी लई miss करतो. ह्यातली काही मंडळी जागा-specific असतात, आणि त्यांच्याबरोबरचे तुमचे अनुभव देखिल कधी-कधी एकदम भारी ठरतात.
उदा.: काशीला गेलो होतो तेव्हा तिथले पंडित लोकं मागे लागले "यह पूजा करो, अपने पापों का प्रायश्चित कर लो"; त्यांना भाव नाही दिला तर फुकटात त्या मान्यवरांकडुन शाप मिळालेले. काय गंमत आहे पहा - पुण्य पैसे देउन विकत घ्यावं लागतं, पण शाप नेहमी फुकटात मिळतात!

तसंच उटीला गाईड महाशयांबरोबरची "फिल्मी चक्कर" देखिल तुम्हाला चक्रावुन सोडते. "साहब - इस पहाडी मैदान पर करिष्मा और आमिर का 'पूछो जरा पूछो' फिल्माया गया था... और यही वो तालाब हैं जहां पर अमिताभ ने श्रीदेवीसे आखरी रास्ता में 'गोरी का साजन, साजन की गोरी' गाया था... और आपने दिल पिक्चर देखी हैं जिसमें माधुरी और आमिरने एक दूसरेसे कहा था, 'मुझे नींद ना आये... मुझे चैन न आये... न जाने कहां दिल खो गया".. वो दिल यही खोया था, उटी botanical garden में इंद्रकुमार के इस favorite पेड के नीचे वो दिल खोया था." अशा वेळी आपल्याला, "अस्सं का? आपल्याला नव्हतं माहित बुवा"च्या सुरात नंदी बैलासारखी मान हलवण्याखेरिज अजुन काहीच पर्याय नसतो! ट्रिपहून परत आल्यावर ट्रिपचे फोटो दाखवताना तिच मान उंचावून सांगते, "यही वो जगह हैं जहा पहले कभी हम आप मिले थे... आप म्हणजे अमिताभ, आमिर, श्रीदेवी, माधुरी बरं का.. आणि कभी म्हणजे.. ते चौघं आधी पोचलेले, आणि आम्ही काही वर्षांनंतर..."

ह्या वर्षी जानेवरी मध्ये राजस्थानच्या चित्तोडगड किल्ल्यावर गेलो होतो, तिथल्या गाईडनीसुद्धा असंच impress केलं. त्या ऐतिहासिक गडावर कोण-कोण राजे कधी-कधी राज्य करित होते, कोणी काय बांधले, कोणी काय तोडले, किती वेळा गडावरच्या रजपुत स्त्रियांनी जोहर केला, राणी पदमिनी आणि तिच्या सौंदर्यावर भाळलेला अल्लाउद्दिन खिलजीची गोष्ट, चित्तोड शहराची २-३ शतकां अगोदरची आणि आजची लोकसंख्या - किल्ल्याचा आणि चित्तोड शहराचा संपूर्ण शतकवारी इतिहास आणि भुगोल - हे सगळं महाशयांना तोंडपाठ होतं. पण त्या गाईडपेक्षा मला किल्ल्यावरच्या राणी महाला बाहेर बसलेली ती म्हातारी आजीबाईच जास्ती आठवते. त्या महालाचा इतिहास गाईड-मुखातुन ऐकताना, मध्येच मागुन एक म्हातारा आवाज आला... सत्तरीतलं वय, चेहऱ्यावर आयुष्यातल्या प्रत्येक पावसाळ्याची एक खूण एवढ्या सुरकुत्या, थोडे जीर्ण झालेले लाल कपडे, उन्हात स्वता:च्या डोक्यावरचा पदर सावरत, अस्खलित इंग्रजीत ती बाई बोलु लागली, "What you see in front of you is the palace of Queen..." चक्क ५ मिनिटं ती बाई बोलत होती आणि आम्ही तिचं ऐकत होतो.. तिचं इंग्रजी थोडं accented पण होतं; कुठे आवाज चढवायचा, कुठे effect करता pause घ्यायचा, तिला पक्क माहित होतं... कदाचित आपण काय बोलत आहोत, शब्दश: तिला कळत पण नसेल, पण कसल्या convictionनी ती ते सर्व बोलत होती. "... and you can know more about the history of this great fort of Chittor in this book. This book is for Rs 20 only." तिचं बोलणं संपलं, आणि मी चटकन ते पुस्तक तिच्याकडुन विकत घेतलं.. कदाचित त्या बाईची एक आठवण म्हणुनच असेल..

इथे US मध्ये टुरिस्ट ठिकाणी असे चित्र-विचित्र colorful लोकं फार कमी भेटतात. गेल्या महिन्यात ओरेगॉन स्टेट मध्ये पोर्टलंडला गेलो होतो. पोर्टलंडला "city of roses" असं का संबोधतात, हे तिथलं Rose Garden बघितल्यावर पटलं. पहिल्या महायुद्धाच्या सुमारास ही बाग प्रस्थापित केली होती. तेव्हा म्हणे युरोप मधली गुलाब झाडं इथे आणली होती. दर वर्षी इथल्या annual rose competion मध्ये वेग-वेगळ्या देशातली लोकं, खरं म्हणजे गुलाबच म्हणा ना, भाग घेतात. आणि विजेता गुलाब गेली ६०-७० वर्षांच्या माजी विजेत्यांच्या बागेतील एका 'winners section' मध्ये आपले स्थान कायम करतो. फक्‍त विजेतेच नाही, तर शेकडो प्रकारचे गुलाब, आणि हजारोंच्या संख्येनी गुलाबाची झाडं - कोणी स्वप्नात सुद्धा एवढे रंग बघितले नसतील, एवढ्या वेग-वेगळ्या रंगाचे गुलाब इथे पहायला मिळतात.

संध्याकाळचे जवळ-जवळ ७ वाजले होते - rose garden मधलं कॉफी शॉप शोधत असताना, माझी नजर समोरच्या बाकावर बसलेल्या एका तरुणीकडे गेली - ब्लॉन्ड लांब केस, आकर्शक व्यक्‍तिमत्व - ती अधुन-मधुन वर पहात होती, तेव्हा तिचे निळे दोळे देखिल द्रुष्टिस पडले. तिच्या निमुळत्या बोटांनी ती कसलं तरी चित्र रेखाटत होती.
ते चित्र बघायची इच्छा होती, का फक्‍त तिच्याशी बोलायची, पण पुढे सरसावुन, मी तिला विचारलं,
"Hello. If you do not mind - may I please look at the sketch?"
मराठी मुली आणि अमेरिकन मुली मधला हा एकमात्र चांगला फरक आहे - अपरिचित मुलाला सुद्धा इथल्या सगळ्या मुली छान हसत-हसत प्रतिसाद देतात.
- "Oh yeah, sure! Why not! Have a look. But I must tell you that its not complete yet.."
"Thanks. Thats ok, I just want to have a look at it."
मग तिचे ते चित्र पहायला सुरुवात केली. चित्रामध्ये समोर कॉफी शॉपच्या शेजारी असलेली बसायची जागा होती - वेल चढवलेली पांढरी नक्षिदार भिंतीची background, त्याच्या पुढे पाणी प्यायचा एक सुंदर, दगडी, नक्षिदार चौथरा होता. एका बाजुला एक सुंदर लॅम्प-पोस्ट उभा होता, त्याच्या मंद प्रकाशामुळे संधीप्रकाशाला एक सोनेरी छटा आली होती - असं ते अप्रतिम चित्र होतं.

"Beautiful. This is really so beautiful", असं म्हणत मी तिच्याकडे परत पाहिलं.
- "Thank you so much. But it is still not done yet - and I have to finish it by tomorrow."
हिला उद्यापर्यंतच का बरं हे चित्र पूर्ण करायचं आहे, हा विचार आधी मनात आला.
पण ते चित्र इतकं सुंदर होतं, की मी तिला दूसराच प्रश्न विचारला,
"You sketch so well. Is this your hobby?"
- "No, this is not a hobby. This is my bread and butter. I am a student, and I sketch to earn some money."

हे ऐकुन मी थक्कच झालो, आणि माझं आशचर्य माझ्या चेहऱ्यावरुन लपलं नाही.
- "These sketches I make, are available for sale for $20 each at the coffee shop. It is closed now, but you can come tomorrow and buy one there if you like."

तिच्या त्या direct, in-your-face वक्‍तव्यावर काय बोलायचे मला काहीच सुचलं नाही. एखाद्या बागेत सगळेच हौसे किंवा मौजेखातर स्केच करणारे असतात - अशी माझ्या भाभडया मनाची गैरसमजुत त्या दिवशी धुळीस मिळाली.

त्या दिवशी जाणवलं - एका चित्रामागे २० डॉलर असो, किंवा एका पुस्तकामागे २० रुपये असो - टुरिस्ट जागा तर आपण नेहमीच पाहतो, पण प्रत्येक टुरिस्टी व्यक्‍ती मागे एक विलक्षण इतिहास, भुगोल आणि भविष्य असतं - ते तरी आपल्याला कधी पहायला मिळतं का?

फूलों की हर पनखुडी अशकों से तर हैं,
क्या पता कौन रोया हैं थाम के दामन बहार का..

चित्तोडगडच्या राणीमहालाच्या बागेत किंवा पोर्टलंडच्या बागेत गुलाबाच्या पाकळ्यांवर रोजच सकाळी दव-बिंदु जमा होत असतील. तिथे माझ्या सारख्या येणाऱ्या असंख्य टुरिस्ट लोकांना त्या आजीबाई किंवा त्या तरुण मुलीची कहाणी माहित नसेल; नशिब, त्यांची दखल त्या फुलांवरच्या दव-बिंदुंच्या रुपात निसर्ग राजा स्वत:च रोज घेतो...
पतझड के कुछ पत्ते...

शिशिर ऋतुच्या हवेच्या एका आल्हाददायक झोक्यावर तरळणारं ते एक पान - काहीसं पिवळंसं, काहीसं तांबुस रंगाचं. आपल्या झाडावरच्या परिवारातल्या बाकी पानांना हवेच्या तालावरच अल्विदा करत-करत, गिरक्या घेत अलगदरित्या ते पान जमिनीवर जाऊन बाकीच्या पानांमध्ये हरवुन पण गेलं. काही क्षणांपूर्वी त्याच वाऱ्यावर ते हसत-खेळत होतं.

जब भी मिलती हैं मुझे अजनबी लगती क्यों हैं,
ज़िन्दगी रोज़ नये रंग बदलती क्यों हैं?

उमराव जानचे ते शब्द त्या पाना करताच होते की काय, असा मला प्रश्न पडला... काही दिवसांपूर्वीच तर ते पान छान टवटवित हिरवंगार होतं; मग हळुच थोडीशी पिवळट छटा आली त्यावर. त्या पानाबरोबरचे बाकीचे सखे-सोयरे पण बदलले - काही पिवळे, काही केशरी, काही गुलाबी, काही तांबडे तर काही अगदी डार्क crimson...

सुर्याची नजर त्या पानांवर पडता क्षणीच, ती पानं एका आगळ्याच राजबिंड्‍या सोनेरी छटेत चमकु लागली; आपल्या झाडावर बसल्या-बसल्या त्यांच्या अवती-भवती वाहणाऱ्या बेधुंद वाऱ्यावर मनमोकळेपणाने खिदळु लागली... काही दिवसातच आपलं आयुष्य एवढं अचानक बदलेल; इतके नविन, इतके गर्द रंग आपल्या आयुष्यात येतील की आपण स्वत:लाच अनोळखी होऊन जाउ.. असं त्या पानांना स्वप्नात देखिल वाटलं नसेल कधी...

न्यु हॅम्पशायरचे 'fall colors' पहायला मी आणि माझे मित्र फ्लोरिडाहून जवळ-जवळ १५०० मैल आलो होतो, आणि आमच्या सारखे अजुन किती तरी पाहुणे कदाचीत आणखिन दूरवरुन आले होते, फक्‍त त्या पानांचे एक ओझरते दर्शन घ्यायला - आणि डोळेभरुन आम्ही निसर्गाच्या जादुई छडीची किमया न्याहळतच बसलो. कधी Peterboroच्या cemetryच्या मधोमध उभे असलेले केशरी maple treeचे सौंदर्य; तर कधी Lake Winnisipaukeeच्या कडेला वसलेले Meredith आणि Moultonboro गावातली टुमदार घरं, आणि त्या घरांच्या आंगणातली 'fall colors'नी फुललेली झाडं... कधी एखाद्या छोट्या गावातल्या चर्चच्या आंगणामधला पिवळ्या-तांबुस पानांचा गालीचा; तर मधेच लागणारे एखादे तळे, त्या तळ्यात हौशीने फिशिंग करणारे locals, rather picnicers... आणि त्या तळाच्या एका कडेला असलेला एखादा छोटासा लाकडी 'covered bridge' ज्याच्यातुन एका वेळेस एकच गाडी येऊ-जाऊ शकते...

Moltonboroहून White Mountainsला जाताना Route-११३ आणि I-९३ च्या दोन्ही बाजूला vibrant रंगांची उभी असलेली Ash, Maple, Aspen, Oak, Birchची झाडं... जणु शिशिर ऋतुनीच आपला ब्रश उचलला, आणि 'त्याच्या' पॅलेटमधुन पिवळा, केशरी, लाल ह्या अगदी बेसिक पेस्टल शेड्सच्या मदतीने इतकं अप्रतिम चित्र रेखाटलं होतं, की पुढल्या वर्षीचा वसंत ऋतु ज्यांच्या नशीबी नाही, ती पानंसुद्धा वाऱ्यावर गिरक्या घेत म्हणत होती,

तुमसे बिछडे हैं तो अब किससे मिलाती हैं हमें,
ज़िन्दगी देखिये क्या रंग दिखाती हैं हमें...


मनोहर रंगाच्या जगात काहीच क्षण त्यांच्या नशीबी आले होते, पण जे काही क्षण त्यांना लाभले, ते जणु जन्नतचे होते, असच वाटलं असेल कदाचीत त्या पानांना...
प्रिय शीतल,

नुकताच "लगे रहो मुन्नाभाई" पाहिला. त्यामध्ये मुन्नाभाई जान्हवी नावाच्या रेडियो जॉकीच्या प्रेमात पडतो. हा पठ्ठ्या एका पोरीच्या आवाजावर इतका फिदा झालेला असतो की रोज सकाळी न चुकता, आपली भाईगिरीची सगळी कामं विसरुन, ३ तास रेडियो समुद्र किनारी ऐकत बसतो.

हा सिनेमा पाहताना नाही म्हट्लं तरी तुझ्या बेंग्लोरच्या 'रेडियो सिटी'वरच्या "मॅटीनी शो"ची जबरदस्त आठवण झाली.

"नमस्ते, मैं हूँ शीतल अय्यर और आप सुन रहे हैं रेडियो सिटीपर मॅटीनी शो. चलो आजके शो की शुरुवात करते हैं इन २ गानो से..."

तुझ्या आवाजावर पण मी असाच जबरदस्त फिदा झालो होतो (imp disclaimers: 1) मी भाई नाही, आणि 2) माझी कितीही तीव्र इच्छा असली तरी तुला मी कधी भेटु शकलो नाहीये) - रोज दुपारी ११ ते २ तुझा "मॅटीनी शो" असायचा - क्लास असला की मुन्नासारखं आपल्याला काही ३ तास सलग ऐकायला नाही मिळायचं - काय करणार, ७५% attendance compulsory होतं ना; पण तरीही एक तास तर एक तास, एखादं गाणं, तर एखादं गाणं - तेवढ्यात तुझा आवाज ऐकायला मिळत आहे - ते काही कमी होतं.

रविवारी मात्र दुपारी १२ ते ४ असं ४ तास तुझा "Full Meals" शो असायचा. रविवारचं लंच कितीही हेवी झालं असलं, तरी हा शो मिस नाही करायचो, नाहीतर पोट एकदम रिकामं-रिकामच वाटयचं. हा शो theme-based असायचा, आणि कधी-कधी तु श्रोत्यांकडुनच एखादा विषय घ्यायची; किशोरच्या पुण्यतिथीला 'किशोर कुमार सोलो स्पेशल', अमिताभच्या वाढदिवसाला 'अमिताभ स्पेशल'; गुलज़ारच्या वाढदिवसाला 'गुलज़ार स्पेशल' आणि त्याबरोबर गुलज़ारचा interview, तर कधी '५०,'६०,'७०,'८०ची दशकवारी गाणी...

तसं तुझ्या शोमध्ये जूनीच गाणी असायची - ती गाणी तर मला खूप आवडायचीच - पण तुझी बोलण्याची लकब, आवाजातील जादु आणि हिंदी सिनेमाबद्दलची अफाट माहिती मला solid impress करायची. आणि मग एखादे शम्मी कपूरचे "दीवाना हुआ बादल" मधिल निरागस प्रेम, किंवा देव आनंदचे "देखो रुठा ना करो" मधिल प्रेयसीला मनवण्याची धडपड, तर कधी गुरु दत्तचे "जाने वो कैसे लोग थे" मधिल pathos... कधी उत्सुक्‍ता, कधी आसुया, कधी लाज, कधी flirting, कधी melancholy, तर कधी आनंद - ह्या सगळ्या भावना फक्‍त गाण्यातुनच नाही, तर तुझ्या आवाजातसुद्धा जाणवायच्या.

तुमच्या बेंग्लोरच्या 'रेडियो सिटी' वर आणखिन एक RJ मला आवडायचा तो म्हणजे चैतन्य हेगडे - त्याच्या इतका 'gentlemanly' आवाज मी आज पर्यंत कधीच ऐकला नाहीये. संध्याकाळच्या बेंग्लोरच्या ट्रॅफीकमध्ये त्याचा शांत, म्रुदु आवाज श्रोत्यांवर नक्कीच एक 'soothing effect' आणत असणार.

२-२.५ वर्ष झाली आहेत बेंग्लोर सोडुन.. तु पण रेडियो सिटी सोडलस असं कळलं... तु आणि चैतन्य आता "WorldSpace" वर RJ आहात.. कधी जमलं तर तुझा आवाज पुन्हा एकदा ऐकायचा आहे.. तुला एकदा तरी भेटावं, तुझ्याशी एकदम दिलखुलास गप्पा माराव्यात, मधुन-मधुन आपल्या दोघांची favourite गाणी आपण एकमेकांना ऐकवायची, नाहीतर तुझ्याकडुन एखादा संगीतकार, गायक, किंवा कवी बद्दल काहीतरी trivia ऐकावी, किंवा एखाद्या गाण्यातल्या मुखड्यातला एक शब्द घेऊन आपण अन्ताक्षरी खेळावी... अशा कितीतरी इच्छा अजुन अपूर्ण आहेत... तो पर्यन्त जर तु हा ब्लॉग कधी वाचलास, तर माझी ही request नक्की play कर,

"याद किया दिल ने, कहा हो तुम,
झूमती बहार हैं, कहा हो तुम..."

तुझ्या आवाजावर निसीम प्रेम करणारा एक श्रोता,
~केतन


आंब्याची पानं आणि झेंडुची फुलं घेउन,
दारावर लावुया सोन्याचं तोरण ॥
आपट्या आणि शमीची पानं घेउन,
आप्तेष्टांबरोबर करुया सोन्याचे घेणं-देणं ॥
विद्या आणि शस्त्रांची पूजा करुन,
विजयादश्मीच्या शुभ मुहुर्तावर करुया सीमोल्लंघन ॥
दसऱ्याच्या सुवर्णसणा निमित्त तुम्हा सर्वांना मंगलमय शुभेच्छा.
~ केतन
तुमको देखा तो यह खयाल आया,
ज़िन्दगी धूप, तुम घना छाया
"जान्हवी, एक गुड न्युज आहे! अगं मला जॉब मिळाला! आणि ह्याचे सगळं श्रेय तुला आहे. तु माझ्या विश्वात आलीस, तु मला पाहिजे तेव्हा support दिलास... आणि माझ्या आयुष्यामध्ये जी काही अस्थिरता होती, ती सगळी कुठच्या कुठे पळाली.. thank you so much!", सागरचे ते फोनवरचे शब्द आजही आठवले की जान्हवीला नकळतच गालातल्या गालत हसु येतं.
कॉलेज मध्ये झालेली ओळख दोघांची. कॅन्टीन मध्ये बसल्या-बसल्या असंख्य चहा-कॉफीच्या कपवर मारलेल्या बेशुमार गप्पांमुळे फुललेली मैत्री; भर पावसामध्ये सागरच्या मागे बाईकवर बसलो असताना अचानक ठरलेल्या सिंहगड ट्रिपची thrill; रात्र-रात्र फोनवर मारलेल्या गप्पा; Valentine-dayला red rosesचा bouqet घेउन आपल्या घराच्या दारामध्ये उभा राहिलेला सागर... मैत्री किती सहजरित्या प्रेमात बदलली...
कॉलेज संपल्यावर आपल्याला तर सहज जॉब मिळाला, पण जॉब मिळवायची सागरनी केलेली जीवापाड धडपड; त्याला मधुन-मधुन येणारी निराशा, आपण त्याचे मनोधैर्य वाढवायचा केलेला प्रयत्न...आणि शेवटी नोकरी मिळाल्याच्या त्याच्या फोनवरच्या आवाजातली excitement... सगळं कसं अगदी आज किंवा फार तर फार कालच घडलं असं वाटत होतं जान्हवीला...

आज फिर दिलने एक तमन्ना की
आज फिर दिल को हमने समझाया
कॉलेज संपलं, दोघांच्या नोकऱ्या सुरु झाल्या; त्यानंतर खरं म्हणजे लग्न ही एकदमच लॉजिकल स्टेप होती. आपण दोघांनी खूप विचार करुन एकमेकांबरोबर सगळं किती छान discuss केलं - घर, करियर, मुलं... सगळं कसं एकदम ideal match होतं... लग्नानंतर आपण आप-आपापल्या करियरमध्ये कितीही busy झालो, तरी प्रयत्नपूर्वक एकमेकांसाठी वेळ काढत होतो...

"सागर, अरे आज काय आहे आठवतय का तुला?"
- "हो! आज माझी महत्त्वाची मीटींग आहे... आजचा deal close केला तर माझं वर्षाचं target मी ८ महिन्यातच achieve करुन टाकेल!"
"हो...बरोबर आहे...संध्याकाळी फ्री आहेस का?"
- "I might be a little late. If the deal closes, we might have a party... and if it doesnt... जाऊ दे, I dont even want to think about the other option.."
"ह्म्म्म... नाही मी थोडे प्लान्स करत होते आज evening करता.. पण राहु दे... तुझे महत्त्वाचे काम आहे आज.."
-"Thanks, आज थोडा busy आहे मी... आपण या रविवारी जाऊ बाहेर... आधी तुझं shopping, आणि मग candle light dinner.."

तु विसरलास...आपल्या लग्नाचा तीसरा वाढदिवस होता.. मी तुला surprise party देणार होते त्या संध्याकाळी... पण unfortunately, you could not close the deal that day...

तुम चले जाओगे तो सोचेंगे
हमने क्या खोया, हमने क्या पाया
तुझ्या कंपनीने तुला २ वर्ष लंडनला पाठवायचं ठरवलं त्या दिवशी किती खुष होतास तु - तुला वाटलेलं की मी आणि रोहन पण तुझ्याबरोबर लंडनला येऊ. पण मला स्वता:चं अस्तित्व उभारायचं होतं. शिवाय रोहनला मला परदेशात नव्ह्तं वाढवायचं.. २ mature adults प्रमाणे आपण ही तडजोड स्वीकारली - २ वर्ष तु लंडनला राहशील, आणि मी इथेच... जसं जमेल तसं आपल्यापैकी कोणीतरी लंडन किंवा भारतात येत-जात राहू...
दोघंही आप-आपापल्या करियरवर concentrate करत राहिलो... यशाची नविन-नविन शिखरं गाठत गेलो... रोहनसुद्धा शाळेत जाऊ लागला.. त्याला कधी-कधी त्याच्या बाबाची आठवण यायची.. मला पण तुझी उणीव भासायची.. तसं आपण फोनवर बोलायचो, पण it isnt the same thing.. then, i realised that everything comes at a price - मी सगळं सोडुन लंडनला यायला तयार नव्हते. आणि तु तरी सगळं सोडुन परत आला असतास का?

हम जिसे गुना-गुना नहीं सकते,
वक्‍तने ऐसा गीत क्यों गाया
२ वर्षाकरता तु गेलास खरं, पण आज ५ वर्ष होत आली - लंडनहून तु पॅरिस आणि मग न्युयॉर्क गाठलस. अधुन-मधुन कधीतरी घरी आलेलास. सुरुवातीला मला एकांतवास चाललेला, खरं म्हणजे तो चालवून घेतलेला. पण आज आता हा एकटेपणा खरच नकोसा झालेला आहे.
का बरं आपण दोघं आपल्या करियरच्या मागे एवढे धावत गेलो... का बरं दूसऱ्याची बाजू समजून घेतली नाही... जीवनाची घडी परत बसवायला आपल्याला परत एखादी संधि मिळेल का... का आपण त्याच्यापण पलिकडे गेलो आहोत...

"हेलो जान्हवी, Good morning! आज तुझी खूप आठवण येत आहे... तुझ्याशी खूप बोलावसं वाटत आहे...आज आपल्या लग्नाचा १०वा वाढदिवस आहे..."
- "सागर, तुझ्या लक्षात आहे.."
"म्हणजे काय... मला दर वर्षी लक्षात असतो... मी फक्‍त आपल्या तीसऱ्या वाढदिवसाला तुला wish केलं नव्हतं...सॉरी.."
- "आज सॉरी म्हणतोयस!"
"राहू दे ग! आज बऱ्याच गोष्टींकरता सॉरी म्हणायचं आहे मला.. लंडन, पॅरिस, न्युयॉर्क... मी पळुन-पळुन दमलो आहे.. इतकी वर्षं तुझ्या आणि रोहनशिवाय राहिलो आहे... कदाचीत तिच माझी सगळ्यात मोठी चूक आहे.. "
- "अरे चूका होतात, म्हणुन तर आपण शिकतो."
"म्हणुनच मी परत घरी यायचं ठरवलं आहे.."
- "कधी येत आहेस?"
"तु आपल्या घराचं दार उघडतेस का? मी बाहेरच उभा आहे..."

तुमको देखा तो यह खयाल आया,
ज़िन्दगी धूप, तुम घना छाया