पुणे-मुंबई प्रवास आणि काही आठवणी
लहानपणापासुन सुट्टीमध्ये मुंबईला जायचं म्हटलं की मन एकदमच आनंदानी नाचु लागायचं. मुंबईला मामाकडे जायचं म्हणजे डेक्कन क्वीननीच जायचं, हा अगदी अलिखित नियम असायचा. आपल्याला ती एशियाड बस, किंवा वातानुकुलित बस, किंवा सध्याची व्होल्वो बस कधीच एवढी आवडली नाही बुवा! दादरला मामाच्या घरी मामा-मामी, मावशा, आजी-आजोबा, पणजोबा-पणजी, मामे-भाऊ - ह्या सर्वांना भेटायची असलेली जबरदस्त उत्सुक्ता; तिथल्या बिल्डिंगच्या कंपाउंडमध्ये खेळलेले क्रिकेट, बॅडमिंटन, डबा-आइसपाइस; शिवाजी पार्कवर मारलेली चक्कर; दादर चौपाटीवर खाललेली भेळ आणि पाणी-पुरी; मे महिन्यात मामानी घरी आणलेले आंबे आणि मग मामीने त्या आंब्यांचा काढलेला रस; आजोबांकडुन मिळालेले आईस्क्रीम; आजीने सांगितलेल्या गोष्टी; पणजोबांच्या पानाच्या डब्यातले गुलकंद; दुपारी घराच्या बाहेर असलेल्या वरांडयात बसुन खेळलेले पत्ते आणि त्या बरोबर तिखट-मीठ लावुन खाललेली कैरी - अशा अमर्याद मज्जांची सुरुवात त्या डेक्कन क्वीनच्या प्रवासानेच व्हायची. त्यामुळे तो प्रवास नेहमीच हवा-हवासा असायचा.
कदाचित त्यामुळेच तो पुणे-मुंबई प्रवास आजसुद्धा एकदम "more than welcome" आहे. गेल्या वर्षी जवळ-जवळ प्रत्येक वीकेंडला मी हा प्रवास करायचो. सोमवारी सकाळी ७.१०ला डेक्कन क्वीन पकडायची आणि ऑफिस गाठायचे - हा अगदी ठरलेला आठवडाक्रम (ह्याला "दिनक्रम" नाही म्हणता येणार). सकाळी घरुन निघताना आईच्या हातचा चहा आणि पोहे/खिचडी/उपमा जरी झाला असला, तरी DQमध्ये सुदेश सिंघना "नाही" कसे म्हणणार. "नाश्ता बोलो साब नाश्ता! गरमा-गरम लाजवाब कटलेट, ऑमलेट, चीज टोस्ट... बोलिये, बोलिये... क्या लेंगे आप" असे म्हणत श्रीयुत सिंघ आपल्या हातामध्ये ब्रेकफास्टचा ट्रे घेउन सगळ्या डब्यांमधुन फिरत असत. आता तुम्हीच सांगा, इतकं प्रेमानी जर सिंघ-साहेब गरम-गरम ऑमलेट/चीज टोस्टचे आमिष दाखवत आपल्यासमोर आले, तर तुम्ही तरी त्यांना नाही म्हणायचे धाडस कराल का? आपल्याला तरी ते कधी जमले नाही बुवा!
सकाळी आधी हातामधला पेपर चाळायचा (आज-काल पेपर हा फक्त चाळण्याकरताच असतो, काही "वाचायचेच" असेल, तर मी बरोबर एखादे पुस्तकच ठेवतो); ८ वाजता मळवली स्टेशन गेलं आणि ८.१० ला लोनावळा येणार त्याच्या आत नाश्ता करायचा. मग खिडकीतुन लोनावळा-खंडाळाचे सौंदर्य निरखायचे - अशा वेळेस आपल्यासमोर किंवा आपल्या शेजारी जर राणी मुखर्जी सारखी एखादी सुंदर मुलगी बसली असेल, तर आपल्यालासुद्धा आमिरच्या स्टाइलमध्ये मानेवर रुमाल फिरवत, जिभेवर काडीपेटितील एखादी काडी विझवत "आती क्या खंडाळा" म्हणायला जमले असते का - असा स्वप्नवत विचार करत असतानाच ड्युक महाराज आपलं भलं मोठं नाक माझ्या स्वप्नातील न फुललेल्या प्रेम-कहाणी मध्ये घुसवतात आणि माझ्या लक्षात येतं की आपण कधी काड्याची पेटि आपल्याजवळ ठेवत नाही म्हणुनच कदाचीत राणी शेजारी किंवा समोर बसली नाहीये. तो पर्यंत ८.३० होऊन मंकी हिल आलेलं असतं आणि अख्खी डेक्कन क्वीन जणु माझ्या या अपूर्ण प्रेम-कहाणीच्या निषेदार्थच २ मिनिटं मौन पाळते, आणि जागीच थांबते. माझी व्यथा केवळ तिलाच कळते, बाकीचे पासेंजर्स आप-आपाल्या गप्पा-पेपरवाचन-झोप या अत्यंत महत्त्वाच्या कामात व्यस्त असतात. मी गपचुप एक कॉफी घेतो, आणि माझ्या दख्खनच्या "राणी"लाच "चलती क्या मुंबईला" म्हणतो. ती पण माझं ऐकते, आणि मग आम्ही दोघं तो प्रवास पुढे चालु ठेवतो.
शुक्रवारी ऑफिसमधुन जमलं तर लौकर कल्टी मारता आली, तर दादरहून मी प्रगती एक्स्प्रेस पकडायचो! ते नाहीच जमलं तर मग शनवारी सकाळची इंद्रायणी एक्स्प्रेस नाहीतर संध्याकाळची प्रगती एक्स्प्रेस पकडायची. ह्या रिटर्न जर्नीची मजापण काही औरच असायची. एकतर घरी परतणार म्हणुन असलेली खुषी, वीकेंड आला म्हणुन वीकेंडला काय-काय करायचं त्याचे प्लॉन्स, आणि मुंबई-पुणे हा खुद्द प्रवासच! कर्जतला बटाटे वडे घेत असताना न चुकता घराच्या जकातनाक्यावर निखिलला द्यायचे असलेले बटाटे वडे पण पॅक करुन घ्यायचे, नाहीतर आपलं काही खरं नाही. तसं तो काही म्हणायचा नाही पण त्याला ते खूप आवडतात, हे माहित असल्यामुळे, का आपण मोठा भाऊ असल्याची जिम्मेदारी संभाळायला पाहिजे, का निव्वळ प्रेमापोटी - कारण काही का असेना, ते बटाटे वडे खाताना आम्ही दोघंही जबरी खुष होतो, हे नक्की खरंय!
तसं ह्या पुणे-मुंबई प्रवासामध्ये आपल्याला अनेक लोकं भेटतात, दिसतात. दर सोमवारी मुंबईला प्रवास करणारी जनता - त्यांची नावं जरी माहित नसली तरी त्यांचे चेहरे आता ओळखीचे झाले आहेत. काही जणं तर दररोज पुणे-मुंबई अप-डाउन करतात, त्या लोकांना तर मी खरोखरच साष्टांग नमस्कार करतो. बरोबरचे सगळेच प्रवासी आपल्या आठवणीनमध्ये राहतात असं होत नाही. काही व्यक्ति विशिष्ठपणे लक्षात राहतात.
जिद्द किंवा उमेदीला कुठली सीमा असते का? हा प्रश्न जेव्हा-जेव्हा पडतो, तेव्हा-तेव्हा प्रगती एक्स्प्रेस मध्ये समोर बसलेल्या एका आई आणि तिच्या मुलाची आठवण होते. मी पुण्याला परत जात होतो, तेव्हा माझ्या समोर एक पन्नाशीच्या आस-पासची एक बाई बसली होती. त्यांच्याकडे बघुन का कुणास ठाउक पण मला माझ्याच आईची आठवण झाली - चेहऱ्यावर एका आईचा असलेला तसाच प्रेमळ भाव, शांत बोलणं, कोणी ओळखीचं समोर आलं तर किंचित म्रुदु हास्य, आणि प्रेमळ विचारपूस.
पावसाळा असल्यामुळे मी खिडकीतून बाहेर खंडाळ्याच्या अलिकडचे धब-धबे पहात होतो, तेव्हाच समोर त्या बाईंची आणि त्यांच्या एका मैत्रिणीच्या गप्पा सुरु झाल्या.
मैत्रिण: "अगं काय म्हणतेस? कित्ती वर्षांनी आपली गाठ होत आहे."
आई: "अगं हो ना. चर्चगेटला ट्रान्सफर झाल्यापासून काम इतकं वाढलं आहे ना. खूप पूर्वी प्रगतीने यायचे, पण आता शनवारची डेक्कनच कशी-बशी पकडते. खरं सांगायचं म्हणजे १५ दिवसातून सध्या एखादीच चक्कर होते माझी पुण्याला. कधी-कधी तर ते सुद्धा जमत नाही. आज थोडं लवकरच काम आटोपलं आणि ही प्रगती पकडली."
मै.: "हं! तरीच मी म्हणत होते की तु एवढ्यात दिसली कशी नाहीस. मला वाटलं की पुण्यालाच ट्रान्सफर घेतलीस की काय. तसं पुण्यालाच ट्रान्सफर झालीस तर श्रेयस करता एकदमच छान होईल ते, नाई?"
आ.: "कुठलं काय अगं! मी गेले ८ वर्ष मुंबईमध्येच आहे, आणि कदाचित रिटायर पण तिथेच होईल. तसं श्रेयस करता मी पुण्यात ट्रान्सफर झाले असते, पण तोच म्हणतो - अगं आई, तु माझी काळजी अजिबात नको करुस."
मै.: "पण त्याचं जेवणाचं काय अगं?"
आ.: "अगं तो खूप छान स्वयंपाक बनवतो - आज मी निघताना ऑफिसमधुन फोन केला, तर मला त्यानी विचारलं - आई, तुला जेवायला काय करु? मी घरी पोहोचे पर्यंत त्याची पोळी-भाजी-आमटी-भात-कोशिम्बीर सगळं तयार झालेलं असेल."
मै.: "काय म्हणतेस??!! माझा विश्वासच बसत नाहीये. सध्या तो काय करत आहे? त्याचे अजुन शिक्षण सुरु आहे का संपलं एकदाचं? तो आधी त्या स्पेशल मुलांच्या शाळेत जात होता ना?"
आ.: "अगं हो! श्रेयस 'स्लो लर्नर' असल्यामुळे लहानपणापासुन त्याची शाळा वेगळी होती. त्याचे मित्रपण जास्ती नव्हते. पण लहानपणापासुनच त्याला चित्रकलेचं वेड होतं, ते त्याला पुढे उपयोगी आले. १०वी झाल्यानंतर त्यानी अभिनवला आड्मिशन घेतली, आणि तिथुन ग्राफिक डिजाईन मध्ये डिप्लोमा केला. शिवाय कॉम्प्युटरचे ग्राफिक डिजाईनचे वेग-वेगळे कोर्स देखिल केले."
मै.: "खरंच, त्यानी खूप कष्ट घेतले गं.. आता सध्या तो काय करत आहे मग?"
आ.: "त्याला मी घरी एक कॉम्प्युटर दिला आहे. तो कॉम्प्युटर ग्राफिक डिजाईन मध्ये फ्री-लान्सिंग करतो - वेग-वेगळी वर्तमानपत्रे, मासिके, दिवाळी अंक, शाळा-कॉलेजेसचे वार्षिक मासिके, विविध कंपन्यांचे वार्षिक अहवाल - असे तऱ्हे-तऱ्हेचे क्लायंट्सचे ग्राफिक डिजाईनचे काम तो करतो. त्याला हे सुरु करुन २-३ वर्ष झाली आहेत. सुरुवातीला त्याला थोडे जड गेले, आणि तुला खरं नाही वाटणार पण दर महा तो १५-२० हजार कमवतो आता."
मै.: "खरं का नाही वाटणार अगं! आपण उगिचच बाकी मुलांना हुशार म्हणत राहतो - पण श्रेयसनी त्याची जिद्द, उमेदी आणि कष्टाच्या जोरावर त्याच्या 'स्लो लर्नींग डिसेबिलिटी'वर मात करुन टाकली. त्याबद्दल खरोखरच त्याला दाद दिली पाहिजे."
आपल्या डोळ्यात आलेले ममत्व, गर्व, आणि प्रेमाचे अश्रु पुसत, ती आई म्हणाली, "थँक्स अगं! देवाची क्रुपा आहे, म्हणुनच हे सगळं झालं, पण माझ्या श्रेयसनी पण तेवढेच कष्ट घेतले, तेवढीच जिद्द दाखवली. पुढच्या १-२ वर्षात त्याचे लग्न करुन टाकायचा माझा विचार आहे. बघुया काय होते ते."
पावसाचे काही बिंदु माझ्या खिडकीच्या बाऱ्स्वर जमा झाले होते. ते पावसाचे बिंदु होते की माझ्या डोळ्यातील अश्रु, हे माझे मलाच कळेना. कधी न पाहिलेल्या श्रेयस बद्दल माझ्या मनात आदर आणि प्रेरणेची भावना जागॄत झाली होती. त्या दिवशी शिवाजीनगर स्टेशनला उतरल्यावर अजुन एका मुंबई-पुणे प्रवास आपण संपवल्याची एक वेगळीच संतुष्टि झालेली.
Posted by
Monsieur K
on Wednesday, September 13, 2006
/
Comments: (12)
"एक, दोन... साडे-माडे... तीन!"
दादरला काडेल रोडवर सिद्धिविनायक मंदिरावरुन एक पाच पावलं पुढे चालत गेलं, की उजव्या बाजुला एक छानसं छोटसं रेस्टॉरंट लागतं - "ऑन द मूव्ह". तसं पाहिलं तर इथे हे रेस्टॉरंट आहे, हे पटकन कोणाच्या लक्षात पण येणार नाही. जागा तशी एकदम छोटीशी - जेमतेम ७-८ टेबलं मावतील एवढी - प्रामुख्याने इथे फोनवर ऑर्डर घेतली जाते, आणि तुम्हाला जे पाहिजे, ते होम-डिल्हिवर केले जाते. पण माझ्यासारखे काही हौशी खवैय्ये फोनवरुन ऑर्डर देण्यापेक्षा तिथेच जाणं प्रिफर करतात.
गेल्या पावसाळ्यात असच एक दिवस मनात मस्त-पैकी गरम व्हेज स्वीट कॉर्न सूप आणि छानसा गरमा-गरम एक आलू पराठा खाण्याची एक अत्यंत तीव्र इच्छा जागॄत झाली - तसं म्हटलं तर पावसाळी हवा असली की काहीतरी गरम-गरम खावं अशी इच्छा वारंवार मनामध्ये येत असते, पण प्रत्येक वेळेस त्या मध्ये आलू पराठाच असेल, किंवा त्यासोबत स्वीट कॉर्न सूपच असेल अशी काही गारेंटी नसते! असो! आणि हे दोन पदार्थ असे देखिल नाहीत की जे फोनवर ऑर्डर देउन मागवावेत. म्हणुन आपली स्वारी घरातून तडक "ऑन द मूव्ह" च्या दिशेनी निघाली.
बाहेर हलकासा पाउस पडत असल्यामुळे, मी त्या रेस्टॉरंट मध्ये एकटाच कस्टमर होतो. सूप आणि पराठाची ऑर्डर देउन मी मोबाइल फोनच्या आड्रेस-बूकमध्ये, आपण बरेच दिवसात कोणत्या मित्रा अथवा मैत्रिणीला फोन केला नाही ह्याचा शोध घेऊ लागलो.मी ह्या अत्यंत गहन आणि महत्वपूर्ण कार्यामध्ये गर्क असताना, एका अगदी टिपिकल मुंबईकर मराठी कुटुंबाने रेस्टॉरंटमध्ये एंट्री मारली.
आई-वडिल, एक मुलगा आणि एक मुलगी - छोटा आणि सुखी परिवार कॉटेगरीमध्ये मोडणारं ते एक कुटुंब. माझ्या समोरच्याच टेबलवर ते कुटुंब स्थानापन्न झाल्यामुळे आणि इतरत्र बाकी कोणी नसल्यामुळे नाही म्हटलं तरी त्या चौघांकडे माझी नज़र गेलीच म्हणा.त्यांच्या वेश-भुषेवरुन मी अंदाज़ लावला की हे लोकंदेखिल इथे आस-पास कुठेतरी रहात असतील. वडील कार्गो शॉर्ट्स, टी-शर्ट आणि सांडल, आई आणि मुलगा जीन्स आणि टी-शर्टमध्ये आणि मुलगी फ्रॉकमध्ये आले होते. तो मुलगा कदाचीत इयत्ता ६-७वी मध्ये असेल, आणि त्याची धाकटी बहिण इयत्ता २-३री मध्ये.
मेनु-कार्ड हातामध्ये घेत वडलांनी प्रश्ण विचारला,
"आज काय ऑर्डर करायचं?"
चिरंजीवांनी लगेच उत्तर दिले, "बाबा, मी इटालियन!"
मातोश्रींनी "मला आपलं साधच काहीतरी पाहिजे... बघु जरा १ मिनिट..."
आणि धाकटी बहिण, आपल्या मोठया भावाच्या चॉईसनी थोडी कन्फ्युस्ड, पण हायली इम्प्रेस्ड असल्यामुळे तिला पडलेला एक मूलभूत प्रश्ण विचारते,
"अरे बाबा, इटालियन म्हणजे काय काय येतं?"
बाबाच्या उत्तराची वाट न पहात तिचा दादा उत्तर देतो, "अगं, तुला पिज़्ज़ा, स्पाघेटी, लसान्य ह्या पैकी काही हवं असेल, तर इटालियन ऑर्डर कर!"
आपल्या दादाच्या अफाट ज्ञानानी अत्यंत प्रभावीत झालेला तिचा चेहरा पाहून मला पण त्या बहिण-भावांचे का कोण जाणे पण एकदम कौतुक वाटले.
त्यांची ऑर्डर देऊन होईपर्यंत, माझे सूप आले होते. गरम सूपाच्या वाफेनीच मी इतका खुष झालो होतो की क्या केहना! सूप घ्यायला मी सुरुवात केली, आणि अधुन-मधुन समोर बसलेल्या त्या सुखी परिवाराकडे लक्ष जात होते. सूप बोल संपवत असतानाच माझा आलू पराठा, आणि त्या पाठोपाठ समोरच्या टेबलचे सूप व स्टार्टर्स आले. काटा-चमचा कोणत्या हातामध्ये पकडायचा, प्लेट्मधील खाद्य-पदार्थ कसा कापायचा, तो कसा खायचा ह्याचे ट्रेनिंग मोठा भाऊ आपल्या धाकट्या बहिणीला देत होता,आणि दोघंही आई-वडिल निखळ प्रेमाने आपल्या मुलांकडे बघत होती.
लोणची मला फारशी आवडत नसल्यामुळे, आलू पराठा अमूल बटर बरोबर जास्ती चांगला लागतो की टोमाटो केचप बरोबर, का बटर आणि केचप दोन्ही एकदम बरोबर घ्यावे, का दही आणि आलू पराठा हेच सर्वोत्तम कॉम्बिनेशन आहे - जसे गांधींचे "माय एक्स्पेरिमेंट्स विथ टॄथ" होते, तसेच मी "आलू पराठा आणि सत्य - माझे प्रयोग" ह्याचा अभ्यास करत होतो. आलू पराठा बरोबर अल्टिमेट कॉम्बिनेशन कोणते ह्या सत्याच्या शोधात माझे हे प्रयोग चालू असताना, माझे लक्ष पुन्हा एकदा समोरच्या बहिण-भावांकडे गेलं.
धा.ब.: "बाबा, आज आम्हाला मराठीमध्ये घडयाळाची वेळ कशी सांगायची, हे शिकवलं."
बाबा: "छान, छान." भिंतीवरच्या घडयाळाकडे बोट दाखवत, "आत्ता किती वाजले आहेत, सांग बरं?"
धा.ब.: "आत्ता ना, आत्ता ना... नौ वर छोटा काटा, आणि बारा वर मोठा काटा.. म्हणजे...उम्म्म.. नाईन ओ'क्लॉक... म्हणजे की नाई...उम्म्म... नऊ वाजले आहेत... बरोबर?"
आई: "अगदी बरोबर! गुड गर्ल!"
मो.भा.: "म्हणजे तुला आता मराठीमध्ये नंबर्ससुद्धा येतात, राईट?"
धा.ब.: "ऑबवियसली! म्हणजे काय?"
मो.भा.: "बरं.. वन, टू, थ्री... म्हणुन दाखव मराठी मधे..."
धा.ब.: "ईSSS... हे तर सोपं आहे एकदम! एक, दोन, तीन, चार, पाच.. सहा... सात.. आठ.. नऊ..दहा... अजुन किती पाहिजे तुला?"
मो.भा.: "बरं..मला सांग... फोर-थर्टी म्हणजे किती वाजले?"
धा.ब.: "फोर म्हणजे चार... फोर-थर्टी म्हणजे साडे-चार... बरोबर?"
मो.भा.: "बरोबर...ह्म्म्म... आता सांग... वन-थर्टी म्हणजे किती वाजले?"
धा.ब.: "वन म्हणजे एक... वन-थर्टी म्हणजे साडे-एक वाजले?"
मो.भा.: "नाहीच मुळी! बरं, टू-थर्टी म्हणजे किती वाजले?"
धा.ब.: "टू म्हणजे दोन... टू-थर्टी म्हणजे साडे-दोन.."
मो.भा.: "नाही गं! अजिबात नाही!"
हिरमुसलेल्या नज़रेनी ती लहान मुलगी आपल्या आई-वडलांकडे बघत होती, तेव्हा तिच्या बाबानी लगेच तिला समजावून सांगितलं,
"अगं.. वन-थर्टी म्हणजे दीड... आणि टू-थर्टी म्हणजे अडिच... आणि फक्त तुला नाही, तुझ्या दादाला, आणि तुझ्या आई-बाबालासुध्दा हे आधी येत नव्ह्तं! आणि दादोबा, तुमच्या करता एक प्रश्ण - इंग्रजीमध्ये - एक, दोन, साडे-माडे तीन म्हणजे काय?"
दादोबा विचार करत असतानाच, बहिणाबाईंनी उत्तर दिले,
"अरे दादा - एक, दोन, साडे-माडे तीन म्हणजे - वन, टू, गेट-सेट गो!"
व्हेज स्वीट कॉर्न सूप आणि आलू पराठयाचे माझे आलेले बिल भरुन मी हळुच त्या प्रसन्न परिवाराकडे एक शेवटची नज़र टाकून, माझ्या घराच्या दिशेनी "एक, दोन, साडे-माडे तीन" केले. आणि माझा सत्याचा शोध पुढिल वेळेकरता ढकलून दिला...